अतिवृष्टी बाधित नागरिक लाभापासून वंचित राहणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

अतिवृष्टी बाधित तालुक्यातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात

सातारा दि.9 – : अतिवृष्टीमुळे पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच कराड तालुक्याचा काही भाग बाधित झाला आहे. अतिवृष्टीत जिवीतहानी, शेतीचे नुकसान तसेच घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असून शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या नुकसानीच्या आराखड्यात कोणताही अतिवृष्टी बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टी बाधित नागरिकांसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जे शेतकरी आहेत त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याच्या शासनाच्या निकाषानुसार लाभ मिळवून देण्यासाठी  तातडीने कार्यवाही सुरु करावी. अतिवृष्टीमुळे गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वाहून गेल्या किंवा ना दुरुस्त झाले आहेत, अशा गावांना प्रत्येक शाखा अभियंत्यांनी  प्रत्यक्ष भेटी देऊन दुरुस्तीच्या खर्चाची आकडेवारी तयार करा.

अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या किंवा शेतीमध्ये मलबा आला आहे याची स्वतंत्र यादी कृषी विभागाने तयार करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या काही गावांमधील घरे मातीखाली गाडली गेली आहेत. त्या गावातील नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यासाठी  निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी  प्रस्ताव करत असताना वन विभागाच्या जमिनीबरोबर खासगी जमिनीचाही पर्याय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये आलेला मलबा हटविण्यासाठी मशिनरी उपलब्ध करुन द्या. जिल्ह्यातील मशिनरी कमी पडत असतील तर त्या बाहेरील जिल्ह्यातून आणा. तसेच बाधितांसाठी निवारा शेडची उभारणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

अतिवृष्टी बाधित गावांमधील विहिरी ह्या गाळाने भरल्या आहेत. गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन द्या. काही गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये गाळ आला आहे. खासगी विहिरी मालक गावच्या पिण्यासाठी पाणी देण्यास तयार आहेत तेथे विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्या. यामुळे गावाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अतिवृष्टीबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या बैठकीत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!