नाशिक बिटको रुग्णालय तोडफोड प्रकरण, नगरसेविकेचा पती पोलिसांना शरण
नाशिक प्रतिनिधी
3 ऑगस्ट
नाशिकमधील बिटको रुग्णालयात धुडगूस घालणार्या भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे पोलिसांना शरण आले आहेत. अटकपूर्व जामीन न मिळाल्याने अखेर राजेंद्र ताजणे अखेर पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांकडून आज राजेंद्र ताजणे यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीनं नाशिक मनपाच्या हॉस्पिटलमध्ये धुडघूस घालून तोडफोड करत दहशत माजवली होती. या घटनेचा सर्व स्तरतून निषेध होत होता. त्यानंतर फरार राजेंद्र ताजणेंवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साऊथ इंडियन सिनेमालाही लाजवेल अशी ताजणे यांनी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली होती. भाजपाच्या नगरसेवक डॉक्टर सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांनी हा प्रकार केला होता.
इनोव्हा कार थेट मनपाच्या बिटको रुग्णालयात घुसवली. काचेचा दरवाजा तोडून गाडी आत शिरताच प्रचंड मोठा आवाज झाला होता. कर्मचारी रुग्णाचे नातेवाईक सैरभैर झाले होते. उपचार घेणारे रुग्ण काय घडले बघण्यासाठी बाहेर आले. ताजणे एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या सोबत आणलेला पेव्हर ब्लॉकचा तुकडा त्यांनी एका नर्सच्या दिशेने भिरकवला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. शिवीगाळ करत धुमाकूळ घालणार्या राजेंद्र ताजणे यांना एका रुग्णाच्या नातेवाईकालाही मारहाणही केली. यानंतर आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी, महापौर सतीश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते तर प्रशासनाने नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणीही मनपा आयुक्तांनी केली होती.
नाशिकमधील बिटको रुग्णालयात धुडगूस घालणार्या भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं होतं. घटनेनंतर जवळपास 24 तासांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. मी काल जे केलं ते निंदनीय आहे, पण ते गरजेचं होतं असं राजेंद्र ताजणे यांनी म्हटलं होतं.
मी चुकीचे काही केलं नाही, कुणाला चुकीचे वाटत असेल तर परिणामांना सामोरं जायला तयार आहे. तिथे रुग्णांना चांगली वागणूक दिली जात नाही. रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जातोय. आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. विधायक मार्गाने अनेकवेळा सांगितले पण उपयोग झाला नाही. केवळ बघतो, करतो अशी उत्तर मिळाली. जवळच्या लोकांचे मृत्यू होत आहे याला येथील स्टाफ जबाबदार आहे, असं आरोपी राजेंद्र ताजणे यांनी म्हटलं होतं.