यावल तालुक्यात वड्री परिसरातील आदिवासी कुपोषीत बालकाचा मृत्यू;वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी.बारेला यांचा दुजोरा.
संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ.
यावल दि.2-(सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील वड्री जवळच्या आदिवासी वस्तीवर राहणार्या एका आदिवासी असलेल्या 8महिन्याच्या कुपोषित बालकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवार दि.31जुलै रोजी सकाळी10:30वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.यावृत्ताला यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यावल तालुक्यातील वड्री धरण येथील आदिवासी वस्तीमधील आकाश जवानसिंग पावरा(वय-8महिने)हा बालक गेल्या8दिवसांपासून आजारी होता.शनिवार31जुलै रोजी पहाटे सहा वाजता त्याची प्रकृती अत्यंत खालावली.त्यामुळे त्याला त्याच्या पालकांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.ग्रामीण रूग्णालयात डॉ.अक्षय नालगे यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली असता बालक कुपोषीत असून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते.त्याला श्वास घेण्यासही खूप अडचणी येत होत्या असे त्यांना आढळून आले. परिणामी वैद्यकीय अधिकारी यांनी बालकाला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले.
या अनुषंगाने शासकीय रूग्ण वाहिकेने बालकाला सकाळी10 वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, बालकाला येथील बालरोग तज्ञ डॉ.अतूल गाजरे यांनी तपासणी केली.यातच बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी बालकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले. दरम्यान,तालुक्यातील कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी दुजोरा दिला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे यावल येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी13जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत कुपोषणग्रस्त बालकांची आकडेवारी विचारली होती.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकासच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी तालुक्यातील कुपोषित बालकांना बाबत माहिती दिली होती यावल तालुक्यातील316कुपोषणग्रस्त तर39बालके कमी जास्त वजनाची बालके असल्याचे समोर आले होते.ही आकडेवारी पाहून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी संबंधित यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले होते.यानंतर आज तालुक्यात कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.यामुळे आता आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करणार याकडे लक्ष वेधून आहे.यावल तालुक्यात कुपोषित बालकांसाठी काय काय शासकीय योजना राबविल्या गेल्या आहेत किंवा राबविल्या जात आहेत याबाबत त्या योजना आदिवासी मुल मुली व कुपोषित बालकां पर्यंत प्रत्यक्षात पोहोचताच किंवा नाही किंवा कागदावरच या सर्व योजना राबविल्या जात आहेत का?याची चौकशी कोणत्या अधिकाऱ्याने केव्हा आणि कशी केलेली आहे याची चौकशी करून संबंधितांवर कड़क कारवाई करायला पाहिजे असे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे योजना राबविताना आदिवासी विकास विभाग,आरोग्य विभाग,पंचायत समिती विभाग जनजागृतीसाठी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून माहिती सुद्धा द्यायला तयार नसतात त्यामुळे आदिवासी योजना ज्या राबविला जात आहेत किंवा पंचायत समिती आणि आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागात ज्या काही योजना राबविल्या जात आहे त्याबाबत दाट संशय व्यक्त केला जात आहे.