अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह

राळेगणसिद्धी येथील बैठकीत राज्यातील माजी जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न.

यावल – दि.21 – ( सुरेश पाटील )

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक तथा प्रणेते आदरणीय अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन यापुढे अखंड सुरू ठेवावे आणि आंदोलनात सहभागी सदस्यांना, नागरिकांना,तरुणांना प्रेरणा द्यावी असा आग्रह राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष,संघटक,निमंत्रक यांनी केल्याने न्यासाची एक आदर्श नवीन घटना तयार करून आंदोलन पुन्हा मोठ्या जोमाने सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन आदरणीय अण्णा हजारे यांनी उपस्थित माजी सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्यांना दिल्यामुळे राज्यातील सर्व माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह विश्वस्त मंडळात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी न्यासाच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारण्या बरखास्त केल्या होत्या त्यामुळे आंदोलनाची गती मंदावली होती आणि कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे अण्णांच्या पुढील आंदोलनाकडे माजी जिल्हाध्यक्ष,सदस्य व ट्रस्टी मंडळी व इतर राज्यातील राजकारण्यांचे समाजसेवकांचे आणि सर्व स्तरातील महिला,पुरुष,तरुण मुले,मुली,विविध संघटना नागरिकांचे लक्ष वेधून होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.या सर्व प्रश्नांना फुल स्टॉप मिळाला.
बुधवार दि.18ऑगस्ट2021रोजी राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे आणि विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीत आंदोलन न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा निमंत्रक,माजी जिल्हा संघटक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली समाजातील सामुदायिक जनहितासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांची भूमिका,ध्येय,उद्दिष्ट हेच महत्त्वाचे ठरणार असल्याने न्यासाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी सदस्यांची, जिल्हाध्यक्ष यांची भक्कम फळी ट्रस्टी ऍड.शाम आसावा,ऍड. अजित देशमुख,अशोकजी सब्बन,बालाजी कोपलवार,शेख अलाउद्दीन,अर्ते यांच्यासह इतर ट्रष्टीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भक्कम फळी निर्माण करून आदरणीय अण्णा हजारे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली लवकरच भ्र.वि.जनआंदोलन न्यासाचे काम पूर्ववत मोठ्या जोमाने सुरू केले जाईल असे मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व उपस्थितांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले, बैठक यशस्वीतेसाठी दत्ता आवारी,कैलास पठारे,शेख अन्सार यांनी उत्कृष्ट नियोजन पूर्वक परिश्रम घेतले.

लोकायुक्त कायद्यात सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार
लोकायुक्त कायदा झाल्यास पुरावे असतील तर आमदार, खासदार,मंत्री यांची सुद्धा चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार लोकायुक्तयास राहणार आहे, कोणाकडे जाण्याची गरज राहणार नाही,कारण लोकायुक्तास सत्र न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत,तसेच न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष सदस्य यांनी तक्रारअर्जा पर्यंत मर्यादित न राहता समाजाचे इतर अनेक सामुदायिक प्रश्न,समस्यांकडे आपले लक्ष केंद्रित करून आंदोलने करायला पाहिजे असे बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शनपर सूचना आदरणीय अण्णा हजारे यांनी दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!