प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम केले पाहिजे – पालकमंत्री सुनील केदार
पालकमंत्र्यांची कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट; सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाचे भूमिपुजन
वर्धा, दि. 17 :
तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकरी संकटात आहे, त्यास विविध कारणे आहेत. शेतकरी राहिला तरच आपण राहू, त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी काम केले पाहिजे, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
आर्वी कृषि उत्पन्न बाजार समितीस आज पालकमंत्र्यांनी भेट दिली तसेच येथील शेतकरी सहकरी जिनिंग व प्रेसिंगच्या गोदामाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इनडोअस स्टेडीयम व व्यायामशाळेची पाहणी तसेच सहकार महर्षी नारायणराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ.रणजित कांबळे, आ.दादाराव केचे, राजुराचे आ.सुभाष धोटे, माजी आमदार सुरेश देशमुख, विरेंद्र जगताप तसेच दिलीप काळे, श्रीधर ठाकरे आदी उपस्थित होते.
कृषि प्रधान देशात शेतकरी संघटीत राहिला पाहिजे. शेतकऱ्यांचे संघटन नसेल तर कुणी त्याच्याकडे वळून पाहणार नाही. ज्याला ज्याला जेजे शक्य आहे ते शेतकऱ्यांसाठी केले पाहिजे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री श्री.केदार म्हणाले. कोरोना काळात शेतकऱ्यांचा माल घ्यायला कोणी तयार नव्हते. कृषि उत्पन्न बाजार समित्या आणि जिनिंग प्रेसिंगचे मोठ्या प्रमाणावर कापसाठी खरेदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि शासनालाही मोठी मदत झाली.
राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांना एकत्र ठेवण्याचे महत्वाचे ठिकाण आहे. बदलत्या काळात बाजार समित्यांनी बदलले पाहिजे, यासाठी आपली मदतीची भूमिका राहील, असेही पालकमंत्री श्री.केदार यांनी पुढे बोलतांना सांगितले. एकेकाळी देशात खायला अन्न नव्हते. बाहेरून धान्य आयात करावे लागत होते. आज आपण अन्नधान्याची निर्यात करतो. आपल्याकडे धान्य ठेवायला जागा नाही, अन्नधान्याची ही मुबलकता केवळ शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच आली असल्याचे ते म्हणाले.
आर्वी येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इनडोअस स्टेडीयम व व्यायामशाळेची पाहणी सुध्दा पालकमंत्र्यांनी केली. सहकार महर्षी नारायणराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित होते. विदर्भात सहकार चळवळ रूजविण्यासाठी अनेकांनी काम केले. अनेकांच्या मेहनतीने एखादी संस्था, चळवळ उभी राहात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी आ.रणजित कांबळे, आ.दादाराव केचे, आ.सुभाष धोटे, माजी आमदार सुरेश देशमुख तसेच दिलीप काळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे संचालक संदीप काळे यांनी केले. कायर्क्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.