पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी

‘शिवस्वराज्य दिन’ जिल्ह्यात उत्साहात साजरा

वर्धा, दि 6 जून :-  महाराष्ट्राच्या जनतेला एका चैतन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. हा सुवर्ण दिवस राज्यशासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्याचे ठरवले. आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री सुनील केदार यांनी शिवशक राजदंड गुढी उभारून जनतेला शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सांगता झाली. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये आज स्वराज्याची गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्यशासनाच्या निधीतून प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिका चालकाला गाडीची कागदपत्रे व किल्ली देऊन करण्यात आले. या 11 रुग्णवाहिका आंजी, वायफळ, सारवाडी, खरंगाणा गोडे, अंतोरा आणि जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच देवळी, पुलगाव ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  आणि दोन  सामान्य रुग्णालय वर्धा येथे देण्यात आल्यात. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्यामुळे रुग्णांसाठी  खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या 11 रुग्णवाहिका पुढे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!