टाकेहर्षला चार महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा महिला ग्रामस्थ हैराण
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: (पांडुरंग दोंदे )
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथे सुमारे चार महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने महिला, ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
टाकेहर्ष येथील ट्रान्सफार्मरची कॉईल जळून तांत्रिक बिघाड होऊन चार महिने झाले आहेत. चार महिन्यांपासून गावात दिवसा व रात्री कमी दाबाने वीजपुरवठा होत असुन अपुर्या वीजपुरवठ्याने येथील विद्युत उपकरणांवर परिणाम झाला आहे.कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने गावातील नळ पाणीपुरवठा चार महिन्यांपासून ठप्प झाला आहे. भर पावसाळ्यात येथील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाजगी विहीरीवर सुमारे एक कि.मी. अंतरावर जीव धोक्यात घालून जावे लागत असे. पावसाळा संपला तरी अजूनही महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाजगी विहीरीवरच जीव धोक्यात घालून जावे लागत आहे . कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने येथील महिला व ग्रामस्थांना अनेक कठिण समस्यांचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने चार महिन्यांपासून घर ,वस्ती व गावात कमी उजेडात राहताना जीव मुठीत धरुन येथील ग्रामस्थांना भितीच्या वातावरणात राहावे लागत आहे.चार महिन्यांपासून दुरवरुन डोक्यावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागत असल्याने महिलांची दमछाक होत आहे. दिपावली सारखा महत्वाचा सण तोंडावर आला असतानाही गावात पुर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्याने दिपावलीचा सण कमी उजेडात की अंधारात जातो की काय ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. येथील कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने त्र्यंबकेश्वर वीज मंडळ व सातपुर येथील वीज मंडळ कार्यालयाकडे याची अनेकदा माहिती देऊनही येथे चार महिन्यांचा कालावधी उलटूनही नवीन ट्रान्सफार्मर बसविला जात नसल्याने वीज मंडळाच्या मनमानी कारभाराबाबत येथील महिला व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असुन गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी सबंधित वीज मंडळाने याची तात्काळ दखल घेऊन टाकेहर्ष येथे नवीन विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.