जांबूनपाड्यात साजरी झाली विकासाची दिवाळी..!
जलपरिषदेच्या सौजन्याने
मुंबईच्या आरोग्य संचालकांकडून पाणीटंचाई दूर पाड्याला नावाप्रमाणे दिला जांभळा रंग
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम अशा खडकओहळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांबूनपाड्यात स्वातंत्र्याच्या काळानंतर आजही अनेक समस्यांचा पाडा वाचण्याइतपत राहिला असून त्यातील एक जांबूनपाड्यात जलपरिषदेच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्त्या सौ.भारती भोये यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक डॉ.अर्चना पाटील,अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार यांच्या उत्तरदायित्वातुन अखेर पाण्याची समस्या दूर झाली असून जांबूनपाड्याची खऱ्या अर्थाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे.विशेष म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या पाणीप्रकल्पाचा थाटामाटात लोकार्पण सोहळा साजरा झाल्याने जणू ग्रामस्थांनी विकासाची दिवाळी साजरी केली.मान्यवरांची पाड्यात एन्ट्री होताच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
जांबूनपाडा हा छोटासा पाडा असून २५ घरांसह १८९ लोकवस्तीचा आहे.या पाड्यात स्वातंत्र्याच्या काळानंतरही अनेक मूलभूत समस्या आहेत.जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्र आहे.मात्र या पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आजही येथील ग्रामस्थांना डोलीचा आधार देत रुग्णसेवा बजवावी लागत आहे.विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांना पाझणाऱ्या पाण्याच्या झिऱ्यावरच तहान भागवावी लागत आहे.अद्याप कुठलीही विहीर नाही.सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्य मुंबई आरोग्य विभाग संचालक डॉ.अर्चना पाटील,अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार यांच्या उत्तरदायित्वातुन या पाझरणाऱ्या झिऱ्याला बांधकाम करण्यात आले.त्यात इलेक्ट्रिक मोटर,पाईप,वायर आदी साहित्याचा समावेश आहे,तर पाड्यात पाणी साठविण्यासाठी नंदुरबारचे सिव्हिल सर्जन डॉ.रघुनाथ भोये,सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये यांनी टाकी उपलब्ध करून दिलेली आहे.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या पाणीप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.पाड्यात पाणी पोहचल्याने जणू विकासाची गंगा वाटचाल करू लागली असून जांबूनपाडा ग्रामस्थांनी विकासाची दिवाळी साजरी करत फटाक्यांची आतषबाजी, मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात जलोशात स्वागत केले.यावेळी ग्रामस्थांनी व मान्यवरांनी सीमांल्लन (शिदसोने)करत आनंद व्यक्त केला.
यावेळी जलपरिषद मार्गदर्शक देविदास कामडी,देवचंद महाले, निशांत पवार,अवनी पवार,पोपट महाले,अनिल बोरसे,अशोक तांदळे,पोलीस पाटील विठ्ठल गावीत,ज्ञानेश्वर खुताडे,जयवंत भोये,लिलाबाई गावीत,भारत वड,संदीप धनगरे,कृष्णा किरकिरे,प्रकाश पवार,राहुल बोरसे,शिक्षक देविदास घुलूम,जे.एन. गायकवाड, आखलाख शेख, वैशाली धनगरे,पिंटी वड,वेणू धनगरे,कौशल्या धनगरे,सुनीता खुताडे आदींसह ग्रामस्थ,मान्यवर उपस्थित होते.
चौकट :१)
गावाच्या जांबून नावाप्रमाणे प्रत्येक घरांना जांभळा रंग
जलपरिषद मिशन जनक पोपट महाले यांनी डोळ्यासमोर संकल्पना ठेवत पाड्याच्या जांबून या नावाप्रमाणे या पाड्याच्या भिंतींना जांभळा रंग देत आकर्षक सुविचार लिहिले आहेत.यामुळे कधी असलेल्या जांबून या झाडाच्या नावाला व ग्रामस्थांच्या जांबूनमाळाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.अस्वच्छता असलेल्या जांबूनपाड्यात मात्र स्वच्छतेचे वारे वाहत असून जांभळ्या रंगाने भिंतीचे रुपडे पालटले आहे.यामुळे या पाड्याची ओळख भिंतीच देत आहेत.
२)
शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
जांबूनपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना यावेळी मुंबई आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार, नंदुरबार सिव्हिल सर्जन डॉ.रघुनाथ भोये,देविदास कामडी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही, पेन,पेन्सिल, खोडरबर, शॉपनर अशा शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
३) फलकाचे अनावरण
जांबूनपाड्याला पाड्याची ओळख दाखविण्यासाठी कुठलेही दिशादर्शक फलक नसल्याने किंवा पाड्याबद्दल माहिती मिळत नसल्याने जलपरिषद मित्र परिवाराच्या माध्यमातून पाड्याकडे जाण्यासाठी खडकओहळ पासून दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहे.पाड्यात एन्ट्री करताच आता जांबूनपाड्याची ओळख पटू लागली आहे.या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावर करण्यात आले.
४) पाड्याच्या नावाप्रमाणे वृक्षारोपण
जांबूनपाड्याची निरंतर जांबून ही आठवण टिकून राहावी यासाठी पाड्याच्या नावावरून जांभळीच्या झाडाचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.जलपरिषदेने पावसात ग्रामस्थांच्या श्रमदानातून १५ हजाराहून अधिक झाडे लावली आहेत.त्यात १ हजार १११ वृक्ष रोपण मोहीम,पशुपक्षी संवर्धन उपक्रम,एक झाड लेकीचे,शेवगापाडा,जांबूनपाडा पाणीटंचाई मुक्तीकडे आदींचा समावेश आहे.
छायाचित्र : जांबूनपाडा : बांधलेल्या हौदाचे पूजन करतांना मुंबई आरोग्य विभाग संचालक डॉ.अर्चना पाटील,अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार,सिव्हिल सर्जन डॉ.रघुनाथ भोये,भारती भोये,देविदास कामडी,देवचंद महाले व ग्रामस्थ.