बॉक्सर पूजा राणीचे ऑॅलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस

टोकियो

31 जुलै

भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. चीनच्या ली क्यूआन हिने पूजा राणीचा 5-0ने एकतर्फा पराभव केला. या पराभवासह पूजा राणीचे टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

चीनच्या खेळाडूने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. तिने पहिल्या राउंडमध्ये पूजा राणीला 5-0 ने पराभूत केले. यात पाचही पंचानी चीनी खेळाडूला संपूर्ण 10-10 गुण दिले.

दुसर्‍या राउंडमध्ये देखील पूजा राणी 5-0 ने पराभूत झाली. चीनी खेळाडूला पंचांनी संपूर्ण 10-10 गुण दिले. तर पूजा राणीला चार पंचांनी 9 तर एका पंचाने 8 गुण दिले. तिसर्‍या राउंडमध्ये देखील चीनच्या खेळाडूचा बोलबाला राहिला. अखेरीस पूजा राणीचा 5-0 ने पराभव झाला.

दरम्यान, पूजा राणीने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये दमदार सुरूवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिने 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला होता.

पूजा राणीने मार्च 2020 मध्ये आयोजित ऑॅलिम्पिक पात्रता फेरीची उपांत्य फेरी गाठत ऑॅलिम्पिकचा कोटा मिळवला. या कामगिरीसह ती टोकियो ऑॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बॉक्सर देखील ठरली होती. चौथ्या मानांकित पूजाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पॉरनिपा चूटी हिचा 5-0ने पराभव करत ही कामगिरी केली होती. दरम्यान, तिला उपांत्य फेरीत चीनच्या ली कियान हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!