टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या टीमला मिळाले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस!

कोलंबो

31 जुलै

भारतीय संघाला श्रीलंका दौर्‍यातील टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने पुनरागमन केले आणि पुढील दोन सामने जिंकून मालिका जिंकली. श्रीलंकेच्या संघाने 2008 नंतर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. या विजयाने खूश झालेल्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाला 10 हजार डॉलर्स म्हणजेच 74 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भारताविरुद्ध घरची मालिका श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट खेळ दाखवून जिंकली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला. भारतीय संघाचे कर्णधारपद अनुभवी शिखर धवनकडे सोपवण्यात आले, तर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून या दौर्‍यावर पाठवण्यात आले. संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आणि शेवटच्या दोन सामन्यांमध्ये युवा संघाला मैदानात उतरवण्यात आले.

श्रीलंका संघाने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 38 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर पुनरागमन केले. अनुभवाची कमतरता असलेल्या खेळाडूंसह उतरलेल्या भारताला श्रीलंकेने दुसर्‍या टी-20 सामन्यामध्ये पराभूत केले तर तिसरा सामना एकतर्फी जिंकला. या मालिकेतील संघाच्या कामगिरीने बोर्ड खूप आनंदी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!