भारत 2 आणखी पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला; दीपिका आणि पूजाची दमदार कामगिरी (सुधारित)
टोकियो,28 जुलै
टोकियो ऑॅलिम्पिकचा सहावा दिवस भारतासाठी आशादायक ठरला. बॅडमिंटन, तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी आज चांगली कामगिरी नोंदवली. यात तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्ये भारत पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि बॉक्सिंगमध्ये पूजा राणी उपांत्यपूर्ण फेरीत पोहोचली आहे. तर बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू नॉकआउट फेरीत पोहोचली आहे.
सहाव्या दिवशी कुठं मिळाला विजय आणि कुठं झाला पराभव
महिला हॉकी – ग-ेट बि-टनने भारतीय महिला हॉकी संघाचा 4-1 ने पराभव केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे.
बॅडमिंटन – भारताचा स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या चियुंग नगन यी हिचा पराभव करत नॉकआउट फेरी गाठली. तर पुरूष गटात बी साई प्रणीतचे आव्हान संपुष्टात आले. नेदरलँडच्या मार्क कॅलजॉव याने प्रणीतचा 21-14, 21-14 ने पराभव केला.
तिरंदाजी – भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारी महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. तर पुरूष तिरंदाज तरुणदीप रॉय आणि प्रविण जाधव यांचे आव्हान आज पराभवासह संपले.
बॉक्सिंग – महिला बॉक्सर पूजा राणीने 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.
नौकानयन – भारताची अर्जुन लाल आणि अरविंद सिंह ही नौकानयन जोडी डबल स्कल्टमध्ये पात्रता फेरी गाठण्यास अपयशी ठरली. त्यांना 6 मिनिट 24 सेंकदासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दोन पदक जिंकण्याची भारताला संधी –
भारताची तिरंदाज दीपिका कुमारी आणि बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्या आहेत. त्या पदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहेत. दरम्यान, वेटलिफ्टर मीरा चानूने रौप्य पदक जिंकत भारताच्या पदकाचे खाते आधीच उघडले आहे. आता यात आणखी किती पदकाची भर पडते, हे पाहवं लागेल.