टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी राहुल द्रविडने केला अर्ज

मुंबई,

आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. या पदासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू ’द वॉल’ राहुल द्रविडने अधिकृत अर्ज केला आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविडचं नाव निश्चित मानलं जात आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड इच्छूक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राहुल द्रविडशी चर्चा करत त्याचं मन वळवलं. राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर श्रीलंका दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍या त्याने मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने श्रीलंकेवर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला होता.

टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकेपासूनच राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडने भारताच्या ज्युनिअर संघासाठी अनेक वर्ष प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाने अंडर 19 विश्वचषकही जिंकला होता.

टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआय 8 कोटींचं वेतन देते. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय राहुल द्रविडला 10 कोटी रुपये वेतन देण्याच्या तयारीत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!