फोटो व्हायरल; पंचाच्या चुकीमुळे आऊट झाला के. एल. राहुल
दुबई,
टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आणि हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा पराभव करत पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाच्या विश्वचषकाची सुरुवात पराभवामुळे झाली. भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले ते म्हणजे, फलंदाजी. दिग्गज फलंदाजांना भरणा असताना विराट-पंत वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. रोहित शर्मा आणि के. एल राहुल बाद युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या मार्यापुढे बाद झाले. भारताच्या सलामीवीरांना बाद करत शाहीनने भारताचे कंबरडे मोडले. पण, पंचाच्या चुकीमुळे के. एल. राहुल बाद झाल्याचे समोर आले आहे. राहुल नो-बॉलवर बाद झाल्याचे सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून स्पष्ट होत आहे. त्यावरुन आता नेटकर्यांनी अंपायर झोपला होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल शाहीन आफ्रिदीच्या अप्रितम चेंडूवर त्रिफाळाचीत बाद झाला. पण, टिव्ही रिप्लायमध्ये शाहीनचा हा चेंडू नो-बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते. एरव्ही सजग असणारे पंच या सामन्यात झोपले होते का? असा प्रश्न नेटकर्यांकडून विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर शाहीनचे गोलंदाजी करतानाचे फोटो नेटकर्यांनी पोस्ट केले आहेत. त्रिफाळाचीत बाद झाल्यानंतर राहुल मैदानाबाहेर गेला खरा.. पण त्यावेळापर्यंत पंच काय करत होते? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्वाच्या सामन्यात केलेल्या चुकीमुळे नेटकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. सुर्यकुमार यादवलाही खराब पंचगिरीचा फटका बसला. हसन अलीने सहाव्या षटकातील तिसरा चेंडू नो बॉल टाकला होता. पण तो चेंडू देखील पंचांनी नो बॉल दिला नाही. त्याच्या दुसर्या चेंडूवरच सुर्यकुमार यादव बाद झाला. भारताचे तीन गडी झटपट बाद झाल्याने धावगतीवर परिणाम झाला.
भारतीय संघातील अव्वल फलंदाजांनी शाहीन आफ्रिदीच्या वेगवान आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजीपुढे नांग्या टाकल्या. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. राहुललाही फार काळ मैदानावर तग धरता आला नाही. विराट कोहलीने आपले काम चोख बजावले. पण, मोक्याच्या क्षणी आपली विकेट गमावली. भारताच्या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना शाहीन आफ्रिदीने बाद केले. पहिल्या सहा षटकात तीन गडी गमावले असताना भारतीय संघाने 20 षटकात 151 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्त्युत्तर पाकिस्तान संघाच्या सलामीवीरांनी एकहाती सामना जिंकून दिला.