इंग्लंडनंतर ऑॅस्ट्रेलियालाही धुतलं, पाकिस्तानविरुद्धच्या मुकाबल्याआधी टीम इंडिया जोरात!

दुबई,

टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिले इंग्लंडचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाने ऑॅस्ट्रेलियालाही धूळ चारली आहे. कांगारूंनी दिलेलं 153 रनचं आव्हान भारताने 9 विकेट राखून पार केलं. रोहित शर्मा 41 बॉलमध्ये 60 रन करून रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलने 39 रन केले. सूर्यकुमार यादव 38 रनवर आणि हार्दिक पांड्या 14 रनवर नाबाद राहिले. ऑॅस्ट्रेलियाकडून फक्त एश्टन अगरला एक विकेट मिळाली. ऑॅस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 17.5 ओव्हरमध्येच केला.

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात सुरुवातीला धक्के बसल्यानंतर ऑॅस्ट्रेलियाची बॅटिंग सावरली. ऑॅस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 152 रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी 153 रनचं आव्हान मिळालं. आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी पॉवर प्लेमध्येच ऑॅस्ट्रेलियाला तीन धक्के दिले, पण यानंतर स्मिथ आणि मॅक्सवेलने कांगारूंचा डाव सावरला. स्मिथने 57 तर मॅक्सवेलने 37 रन केले. मार्कस स्टॉयनिस 41 रनवर नाबाद राहिला. भारताकडून अश्विनने दोन तर रविंद्र जडेजा आणि राहुल चहरला एक विकेट मिळाली.

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑॅस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय टीम रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरली. विराट कोहलीला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराटसोबतच बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील हा सामना खेळले नाहीत. भारत आणि ऑॅस्ट्रेलिया यांनी त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला होता. भारताने इंग्लंडचा तर ऑॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला.

याआधीच्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 विकेट आणि एक ओव्हर राखून पराभव केला होता. इंग्लंडने दिलेलं 189 रनचं मोठं आव्हान भारताने अगदी सहज 19 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं होतं. केएल राहुल आणि इशान किशन या दोन्ही ओपनरनी धमाकेदार अर्धशतकं करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

इंग्लंड आणि ऑॅस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. या टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा हा अखेरचा सराव सामना होता. या मॅचनंतर 24 ऑॅक्टोबर म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली मॅच होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!