भारताचा आठवावा प्रताप

माले,

दक्षिण् आशियाई देशांच्या (सॅफ) फुटबॉल स्पर्धेत भारताने वर्चस्व राखताना आठव्या जेतेपदावर नाव कोरले. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सुनील छेत्री आणि सहकार्‍यांनी शनिवारी नेपाळवर 3-0 असा विजय मिळवताना दमदार पुनरागमन केले. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात भारताचे हे पहिलेच जेतेपद पटकावले.

गटवार साखळीत एकही पराभव न पाहिलेल्या भारताचे अंतिम फेरीत नेपाळविरुद्ध पारडे जड होते. त्यात नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. मध्यंतरानंतर झालेल्या तिन्ही गोलांच्या जोरावर भारताने फायनल एकतर्फी करून टाकला. भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले. चौथ्या मिनिटाला मोहम्मद यासिर व अनिरुद्ध थापाने मारलेले सलग दोन फटके नेपाळचा गोलरक्षक किरण कुमार लिंबूने अडवले. यानंतर 27व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीचा गोल मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

उत्तरार्धात मात्र भारताच्या आक्रमणाला अधिक धार आली. 49व्या मिनिटाला छेत्रीने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, तर पुढच्याच मिनिटाला सुरेश सिंहच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली. यानंतर पिछाडीवर पडलेल्या नेपाळने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने प्रतिहल्ला सुरु ठेवत नेपाळच्या बचावफळीवर दडपण टाकले. अखेर 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत सहाल अब्दुल समदने गोल करत भारताची गोलसंख्या तीनवर नेली.

भारताने ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील वर्चस्व अबाधित राखताना आठव्यांदा जेतेपद पटकावले. आशिया खंडातील ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणार्‍या संघांच्या यादीत मालदीवचा दुसरा क्रमांक असून त्यांनी दोनदा विजेतेपद मिळवले. भारताने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये ही स्पर्धा जिंकली. तसेच भारतीय संघ चार वेळा या स्पर्धेचा उपविजेता होता.

कर्णधार छेत्रीने नेपाळविरुद्धच्या गोलचे खाते उघडले. हा त्याचा यंदाच्या स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. त्यामुळे त्याने अर्जेटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीच्या (80) आंतरराष्ट्रीय गोलसंख्येशी बरोबरी केली. 37 वर्षीय छेत्रीने भारताकडून 125 सामन्यांत 80 गोल केले आहेत. तसेच या वर्षांत त्याने उत्कृष्ट कामगिरी करताना 10 सामन्यांत 8 गोल झळकावले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!