केकेआर ला पुढील सिझनमध्ये मिळणार नवा कॅप्टन, मॉर्गनची होणार हकालपट्टी!
मुंबई,
कोलकाता नाईट रायडर्सनं यंदा 7 वर्षांनी आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात सर्वांनी योगदान दिलं आहे. फक्त कॅप्टन इयन मॉर्गनचा अपवाद आहे. वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टननं या आयपीएल सिझनमध्ये सपशेल निराशा केली आहे. मॉर्गननं या आयपीएलधील 16 मॅचमध्ये फक्त 129 रन केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 11.72 असून स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी आहे.
आयपीएलच्या पुढील सिझनपूर्वी मेगा ऑॅक्शन होणार आहे. मॉर्गन पुढच्या वर्षी केकेआरचा कॅप्टन नसेल, असं भाकित टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं आहे. केकेआर पुढच्या वर्षी मॉर्गनला रिटेनही करणार नाही, असं भाकित सेहवागनं व्यक्त केलं आहे. सेहवागनं यावेळी मॉर्गनचा रविचंद्रन अश्विनशी झालेल्या वादाचा उल्लेखही केला. मॉर्गननं या सिझनमध्ये बडबड करण्याशिवाय काहीही केलं नाही, असा टोला सेहवागनं लगावला आहे.
आयपीएल 2022 मध्ये 8 ऐवजी 10 टीम उतरणार आहेत. यासाठी जानेवारी महिन्यात मेगा ऑॅक्शन होणार आहे. या सिझनपूर्वी केकेआर शुभमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या भारतीय खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. तर विदेशी खेळाडूंमध्ये आंद्रे रसेलचं पारडं सर्वात जड आहे.
कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 3 विकेटनं पराभव करत आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये केकेआरनं 3 विकेटस आणि 1 बॉल राखून निसटता विजय मिळवला. पुणेकर राहुल त्रिपाठीनं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत केकेआरला आयपीएल इतिहासात तिसर्यांदा फायनलमध्ये पोहचवलं.
दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या 136 रनचा पाठलाग करण्यासाठी केकेआरनं भक्कम सुरुवात केली होती. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 रनची पार्टनरशिप केली. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या अय्यरनं तिसरं आयपीएल अर्धशतक झळकावलं. त्यानंतर लगेच तो 55 रन काढून आऊट झाला. अय्यर आऊट झाल्यानंतरही केकेआरचं पारडं जड होतं. 16 व्या ओव्हरमध्ये केकेआरची 1 आऊट 123 अशी भक्कम स्थिती होती.
नॉर्खियानं नितिश राणाला आऊट करताच ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. आवेश खाननं पुढच्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलचा (46) अडथळा दूर केला. गिल आऊट होताच केकेआरचे खेळाडू मैदानात फक्त हजेरी लावून परतत होते. कॅप्टन मॉर्गनही शून्यावरच आऊट झाला.