कोलकाताचे पाऊल पडते पुढे

दुबई,

गोलंदाजांच्याप्रभावी कामगिरीनंतर शुबमन गिलच्या (51 चेंडूंत 57 धावा) फटकेबाज अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी झालेल्या दुसर्‍या लढतीत तळातील सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट आणि दोन चेंडू राखून मात करताना आयपीएल 2021मधील गुणतालिकेत चौथे स्थान कायम ठेवले. तसेच 13 सामन्यांत 12 गुण मिळवत प्ले-ऑॅफ फेरीसाठी प्रबळ दावेदारी पेश केली.
हैदराबादचे 116 धावांचे माफक गाठताना कोलकात्याला विजयासाठी शेवटच्या षटकाची पाहावी लागली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर युवा उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी आणि रशिद खानच्या फिरकीपुढे कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट धावा जमवता आल्या नाहीत.
मात्र, 7 षटकांत 2 बाद 38 धावांवरून शुबमन गिल आणि नितीश राणाने (25) तिसर्‍या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करताना संघाला सुस्थितीत आणले. गिलने 57 चेंडूंत अर्धशतकी मजल मारताना कोलकात्याला विजयासमीप आणून ठेवले. गिल आणि राणा बाद झाल्यावर अनुभवी दिनेश कार्तिकने (नाबाद 18) सूत्रे हाती घेतली. कार्तिकनेच चौकार लगावून कोलकाताच्या सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना फॉर्मात नसलेल्या हैदराबादला 8 बाद 115 धावाच करता आल्या. वृद्धिमान साहा (0) पहिल्याच षटकात माघारी परतला. कर्णधार केन विल्यम्सनला (26) शाकीब अल हसनने धावचीत केले. जेसन रॉयसुद्धा (10) चमक दाखवू शकला नाही. सुरुवातीच्या या तीन धक्क्यांतून हैदराबादचा संघ सावरू शकला नाही. अब्दुल समदने (25) मोलाचे योगदान दिल्यामुळे हैदराबादला किमान 100 धावांचा टप्पा गाठण्यात यश आले.
हैदराबादला हरवून 13 सामन्यांत सहावा विजय मिळवणार्‍या (12 गुण) कोलकात्याने बाद फेरीच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना शेवटच्या साखळी लढतीत राजस्थान राजस्थानला हरवावे लागेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!