राशिद खानने ’धोनी स्टाईल’ने हेलिकॉप्टर शॉट मारला पण…, व्हिडीओ होतोय व्हायरल
नवी दिल्ली,
रविवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. 13 सामन्यामध्ये कोलकात्याचे आता 12 गुण झाले असून संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्याच्या 19 व्या षटकात हैदराबादच्या राशिद खानने धोनी स्टाईलने हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. राशिद खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राशिद खानने 19 व्या षटकातील दुसर्या चेंडूवर धोनी स्टाईलने हेलिकॉप्टर शॉट मारला. हा त्याचा शॉट परफेक्ट लागला आणि उंच उडाला. पण तो सीमेपलिकडे न जाता त्या आधीच क्रॅश झाला. सीमारेषेवर असलेल्या व्यंकटेश अय्यरच्या हातात चेंडूत विसावला.
राशिद खानने या आधी अनेकदा महेंद्रसिह धोनीचे कौतुक केलं आहे. त्याच्या सारखा हेलिकॉप्टर शॉटही मारायचा अनेकदा प्रयत्न केला आहे.
काल झालेल्या सामन्यात हैदराबादने पहिल्यादा फलंदाजी करताना 20 षटकांत 115 धावा केल्या होत्या. कोलकात्याने या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत शेवटच्या षटकात चार गडी गमावून विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याच्या प्ले ऑॅफ मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत.
कोलकाताचा 13 सामन्यांतील हा सहावा विजय आहे. गुणतालिकेत तो चौथ्या स्थानावर आहे. प्ले ऑॅफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला हा सामना कोणत्याही किमतीत जिंकावा लागणार होता. मात्र, त्याच्या गोलंदाजांनी हे काम आणखी सोपे केले. कोलकात्याच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली आणि हैदराबादला फक्त 115 धावांवर रोखले.