रोहित शर्माची क्वारंटाइनमध्येच ट्रेनिंग सुरू, मुंबई इंडियन्सने शेअर केले फोटो
दुबई,
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2021 च्या दुसर्या सत्रासाठी सज्ज झाला आहे. तो यूएईत क्वारंटाइन काळात देखील कस्सून ट्रेनिंग करत आहे. दरम्यान, आयपीएल 2021 च्या दुसर्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज सूर्यकुमार यादव हे तिघे इंग्लंडहून खास चार्टर विमानाने यूएईत दाखल झाले. यानंतर तिघांनाही सहा दिवसांसाठी क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले. या काळात रोहित शर्मा ट्रेनिंग करताना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने रोहित शर्माचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात रोहित सायकलच्या मदतीने व्यायाम करताना पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जेम्स पामेंट यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात ते यूएईत दाखल झालेले मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ गतविजेता आहे. आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याने आपल्या अभिमानाला सुरूवात करणार आहे. यानंतर मुंबईचा सामना अबुधाबीमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.
आयपीएल 2021 चा हंगाम मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मध्यातून स्थगित करण्यात आला होता. भारतात झालेल्या या हंगामात काही खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाली. यामुळे बीसीसीआयने तात्काळ हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता हा उर्वरित हंगामात यूएईत खेळवण्यात येणार आहे. याची सुरूवात 19 सप्टेंबर होणार आहे. सर्व संघ दुसर्या सत्रासाठी यूएईत दाखल झाले आहेत.