टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडण्याची शक्यता

मुंबई

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. विराट कोहलीने येत्या ऑॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित शर्माची त्याच्या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पण विराटने कसोटी संघाचे नेतृत्व आपल्याकडेच ठेवण्याचे ठरवल्याचीही माहिती आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑॅफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार, टी-20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा विराटच्या जागी रोहित शर्माकडे दिली जाऊ शकते. विराट कोहलीने या विषयावर गेल्या काही दिवसांत संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केल्याची माहिती आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहलीची गणती होते. आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला आहे.

तिन्ही प्रकारचे कर्णधारपद विराट कोहलीकडे असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होताना दिसत असल्यामुळे कर्णधारपदाचा राजीनामा त्याने दिला तर ते त्याच्या फलंदाजीसाठी चांगले असेल असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. तर सध्या तिन्ही प्रकारात रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम सलामीवीर समजले जाते. त्यामुळेच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांचे मत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!