सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने टोकियो 2020 पॅरालिम्पिक पदक विजेते आणि भारतीय पथकातील सदस्यांचा केला सत्कार
मुंबई
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोकियो 2020 मधील पॅरालिम्पिक पदक विजेते आणि भारतीय दलातील इतर खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सत्कार केला.
केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी सर्व पदकविजेत्यांचे आणि भारतीय पॅरालिम्पिक दलातील प्रत्येक सदस्याचे त्यांनी देशाला गौरव मिळवून देण्यासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले. जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करू शकणारे दिव्यांग क्रीडापटू घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांनी भारतीय पॅरालिम्पिक संघाच्या प्रशिक्षकांचेही आभार मानले.
दिव्यांग क्रीडापटू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पॅरालिम्पिक खेळांचा विकास व्हावा आणि पुढील पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पदकांची संख्या दुप्पट व्हावी, अशी आकांक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण भारतीय पॅरालिम्पिक दलाचे टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल आणि विक्रमी संख्येने पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
सामाजिक न्याय आणि मंत्रालयाने प्रथमच पॅरालिम्पिक विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान केले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्यार्ंनी सुवर्णपदकासाठी 10 लाख रुपये, रौप्यपदकासाठी 8 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 5 लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते. रोख पुरस्कार खेळाडूंच्या थेट बँक खात्यात जमा केला जाईल.