शेफाली वर्माचे टी-20 आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम

दुबई,

भारताची युवा स्टार महिला क्रिकेटर शेफाली वर्माने आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची सोफी डिवाईन इंग्लंडच्या नताली स्किवर सोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचली आहे.

आयसीसीने महिला टी-20 ची क्रमवारी जारी केली आहे. यात शेफाली वर्मा 759 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑॅस्ट्रेलियाची बेथ मूनी 744 गुणांसह दुसर्‍या तर भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना 716 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. ऑॅस्ट्रेलियाची मेग लेनिंग 709 गुणांची कमाई करत चौथ्या स्थानी आहे. सोफी डिवाईनची क्रमवारी एका स्थानाने सुधारली आहे. ती 689 गुणांसह पाचव्या स्थानावर सरकली आहे.

सोफीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली होती. याचा तिला फायदा झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिने फलंदाजीत 50 धावा आणि गोलंदाजीत 2 गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी नोंदवली होती. याच प्रदर्शनाच्या जोरावर तिने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या नताली स्किवरसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पटकावलं आहे.

दीप्ती शर्माची क्रमवारी सुधारली

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा, ऑॅस्ट्रेलियाची एलिस पेरी आणि वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्या अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलरची तीन स्थानाने घसरण झाली असून ती सातव्या स्थानावर फेकली गेली आहे.

गोलंदाजीत ऑॅस्ट्रेलियाची मेगन शूट दोन स्थानाच्या प्रगतीसह दुसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. ऑॅस्ट्रेलियाची जेस योनासेन एका स्थानाच्या फायद्यासह चौथ्या स्थानावर आहे. भारताची दीप्ती शर्मा सहाव्या तर पूनम यादव आठव्या स्थानावर कायम आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!