अनुभवी सर्फराझ, झमनला वगळले
कराची,
आगामी टी-टवेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ सोमवारी जाहीर झाला. या संघातून अनुभवी खेळाडू सर्फराझ अहमद तसेच फखर झमनला वगळण्यात आले आहे. मधल्या फळीतील फलंदाज असिफ अली तसेच खुशदील शाह यांना संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौर्यात खेळलेल्या अर्शद इक्बाल, फहीम अशरफ, फखर झमन, शरजील खान आणि उस्मान कादिर या खेळाडूंना टी-टवेन्टी वर्ल्डकप संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दरम्यान, झमन व कादिरसह शाहनवाझ दहानी यांना राखीव म्हणून युएईमध्ये संघासोबत नेले जाणार आहे. मात्र, सर्फराझला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या वर्ल्डकप संघात पाच फलंदाज, चार अष्टपैलू, तितकेच गोलंदाज तसेच दोन यष्टिरक्षकांचा समावेश आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ टी-टवेन्टी वर्ल्डकपसाठी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) रवाना होण्यापूर्वी, मायदेशात इंग्लंड आणि न्यूझीलंडशी सात वनडे सामने खेळेल. हे सामने लाहोर तसेच रावळपिंडी येथे 25 सप्टेंबर ते 14 ऑॅक्टोबर या कालावधीत होतील. यूएईत 17 ऑॅक्टोबरपासून सुरू होणार्या टी-टवेन्टी वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी 24 ऑॅक्टोबरला एकमेकांशी भिडतील.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), असिफ अली, आझम खान, हॅरिस रौफ, हसन अली, इमाद वासिम, खुशदील शाह, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हस्नेन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम ज्युनियर, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेब मकसूद.
राखीव : फखर झमन, उस्मान कादिर, शाहनवाझ दहानी.