भारतीय संघ चौथ्या कसोटीत ’या’ खेळाडूंना देऊ शकतं संधीलंडन,
लंडन,
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना कोणत्या परिस्थितीत जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही. दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगले प्रदर्शन करत विजय मिळवला. पण तिसर्या कसोटीत इंग्लंडने दमदार वापसी करत मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशजनक राहिली. यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
आर. अश्विनला मिळू शकते अंतिम संघात स्थान –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला अनेक दिग्गज खेळाडूंनी मागील सामन्यात स्टार फिरकीपटू आर अश्विनला संघात स्थान द्यावं, असा सल्ला दिला होता. पण विराट कोहलीनी विजयी संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अशात भारतीय संघाची कामगिरी खराब ठरली. आता पुन्हा आर. अश्विनला अंतिम संघात स्थान मिळाले, अशी मागणी दिग्गजांनी केली आहे. यामुळे आशा आहे की, चौथ्या सामन्यात आर. अश्विनला अंतिम संघात स्थान मिळेल.
शार्दुल ठाकूर देखील झाला फिट –
शार्दुल ठाकूर पूर्णपणे फिट झाला आहे. तो गोलंदाजीसोबत फलंदाजी करण्यात देखील माहीर आहे. त्याचा मागील रेकॉर्ड पाहता तो एक महत्वाचा खेळाडू आहे. यामुळे त्याला चौथ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम संघात स्थान मिळू शकते.
इशांत शर्माला मिळणार डच्चू?
इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात इशांत शर्माला एकही गडी बाद करता आला नाही. त्याने स्वैर मारा केला. दुसरीकडे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी शानदार गोलंदाजी केली. इशांत शर्माची कामगिरी पाहता त्याला चौथ्या कसोटी सामन्यात डच्चू दिला जाऊ शकतो. इशांत शर्मा शिवाय रविंद्र जडेजा देखील फार्मात पाहायला मिळाला नाही. त्याच्यावर देखील संघाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. अशात संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरच्या फळीतील फलंदाजांकडून मोठ्या खेळीची आशा
केएल राहुल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून चौथ्या कसोटी सामन्यात मोठ्या खेळीची आशा आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली याचा फार्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांना आपला खेळ उंचावण्याची गरच आहे. तसेच ॠषभ पंतला देखील जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ पूर्ण जोशात आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. उभय संघातील मालिका सद्यघडीला 1-1 अशा बरोबरीत आहे. अशात चौथा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.