भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणार्या उन्मुक्त चंदची निवृत्ती
नवी दिल्ली
28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक उन्मुक्तने जिंकून दिला होता. विशेष म्हणजे तो 2012 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. तो आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार आहे. त्याने आपल्या निवृत्तीबाबत टवीट करत घोषणा केली आहे. त्याने एका टिवटमध्ये ‘रुक जाना नहीं कभी तू हार केष्ठ’ या गाण्यासह भारतीय संघातील आणि आयपीएलमधील आठवणींचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्याने आपल्या टिवटमध्ये म्हटले आहे की, क्रिकेट हा एक सार्वत्रिक खेळ आहे. त्याचा अर्थ बदलू शकता, परंतु तुमचे ध्येय एकच असू शकते, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळ करून दाखवणे. मला मोलाची साथ देणार्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्यासारखी माणसे माझ्याकडे आहेत याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आता पुढील वाटचाल करायची आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उन्मुक्त दिल्ली आणि उत्तराखंड या संघांकडून देखील खेळला असून त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. पण त्याला तिथे म्हणावे असे यश मिळाले नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 120 सामन्यात दमदार फलंदाजी करत उन्मुक्तने 41.33 च्या सरासरीने 4505 धावा केल्या आहेत. यात सात शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
उन्मुक्त चंदच्या आधी स्मित पटेलनेही दुसर्या देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो देखील 2012 अंडर -19 विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. स्मित पटेलने मे महिन्यात भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.