टोकियोमध्ये सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक नवे रुग्ण, ऑॅलिम्पिकमध्ये 430 जण कोरोनाबाधित
टोकियो
8 ऑगस्ट
एकीकडे टोकियो शहरात ऑॅलिम्पिकच्या स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी टोकियोमध्ये कोरोनाचे 4,566 नवे रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. टोकियोमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी चार हजाराहून जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. टोकियो ऑॅलिम्पिक सुरु झाल्यापासून आतापर्यंत ऑॅलिम्पिकशी संबंधीत 430 रुग्ण सापडल्याचं वृत्त जपानच्या क्योडो न्यूज या माध्यमाने दिले आहे.
ऑॅलिम्पिक सामने सुरु झाल्यापासून आतापर्यंत ऑॅलिम्पिक असोसिएशनशी संबंधित एकूण 430 जण कोरोनाबाधित झाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी यातील 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता टोकियो ऑॅलिम्पिक यावेळी प्रेक्षकांविना पार पाडण्यात येत आहे.
संपूर्ण जपानचा विचार करता शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे 15,753 नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत जपानमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी जपानमध्ये टोकियो, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावा या भागात 31 ऑॅगस्टपर्यंत कडक आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. या भागातील तसेच देशातील अन्य भागातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना जलदगतीने करण्यात येत आहेत.
येत्या काही दिवसात जपानमध्ये बॉन हॉलीडेचा काळ सुरु होणार आहे. हा जपानी लोकांचा व्हेकेशनचा काळ असून त्यावेळी अनेकजण आपल्या मूळ गावी जातात किंवा इतरत्र फिरायला जातात. त्यामुळे पुन्हा एकदा जपानवर कोरोनाच्या संकटाचा धोका निर्माण झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानी सरकार आपल्या सर्व क्षमतांचा वापर करेल अस सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जपान सरकारने आपल्या नागरिकांना आवश्यक असल्यासच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.