भारताला गोल्फमध्ये मिळणार सुवर्ण पदक? अदिती अशोक पदकाजवळ पोहोचली
टोकियो
6 ऑगस्ट
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळू शकत. स्टार महिला गोल्फपटू अदिती अशोक हिने शानदार प्रदर्शन केले आहे. यामुळे पदकाच्या आशा वाढल्या आहेत. अदिती महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्लेच्या तिसर्या फेरीनंतर दुसर्या स्थानावर राहिली.
अदितीला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे. जर खराब हवामानामुळे उद्या शनिवारी चौथा आणि अंतिम फेरी झाली नाही तर अदितीला रौप्य पदक मिळू शकतं. जर अंतिम फेरी पूर्ण झाली तर ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार ठरेल. 23 वर्षीय अदिती अशोक बंगळुरूची आहे.
अदितीने जर पदक जिंकलं तर ते भारतीय गोल्फसाठी ऐतिहासिक बाब ठरेल. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये गोल्फ खेळात पदक जिंकलेले नाही. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये अदिती सहभागी झाली होती. ती त्या स्पर्धेत महिलांमध्ये सर्वात कमी वयाची गोल्फर होती. आता तिने आपल्या कामगिरी सुधारणा करत पदक जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
अदिती म्हणाली की, ‘रिओ ऑलिम्पिकमधील अनुभवाचा फायदा मला झाला. ऑलिम्पिक विलेजमध्ये राहणे आणि अॅथलिटना पाहणे हे शानदार अनुभव होता. मला वाटत की, मी या स्पर्धेत चांगलं फिनिश करेन. मी पदक जिंकण्याचा संपूर्ण प्रयत्न करेन.‘
तीन फेरीत अदिती दुसर्या स्थानावर
23 वर्षीय अदिती अशोकने गुरूवारी दुसर्या फेरीत शानदार कामगिरी केली. तिने 5 बर्डी लगावत 66 चा कार्ड खेळला. पण ती जगातील एक नंबर गोल्फर नेली कोर्डाला मागे टाकू शकली नाही. नेला कोर्डा दुसर्या फेरीत 62 च्या जबरदस्त कार्ड खेळत पहिल्या स्थान काबिज केलं. दोन फेरीनंतर तिचा एकूण स्कोर 13 अंडर 129 होता. तर अदितीचा 133 असा होता.
आज शुक्रवारी तिसर्या फेरीत कोर्डाने 69 कार्ड खेळत अव्वलस्थान राखलं. अदिती तिसर्या फेरीत 68 कार्डसह दुसर्या स्थानावर कायम राहिली. अदितीने आज जबरदस्त खेळ केला. तिला खराब हवामानामुळे अनेक अडचणींना समोरे जावे लागले. तरी देखील तिने तीन होल्स मध्ये तीन बर्डी लगावले.
बर्डी हा काय आहे प्रकार…
प्रत्येक होलसाठी गोल्फरला स्ट्रोक घेण्यासाठी एक संख्या निर्धारित केली जाते. ती तीन, चार किंवा पाच असू शकते. खेळाडूंना त्या स्ट्रोक्स संख्येमध्ये चेंडूला होलमध्ये न्यावं लागतं. जर यात खेळाडूने एक स्ट्रोक कमी घेत असे केलं तर त्याला बर्डी म्हटलं जातं. तर दोन स्ट्रोक कमी घेत असे केलं तर त्याला ईगल असे म्हणतात.