कुंबळेला मागे टाकून अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज
नॉटिंघम
6ऑगस्ट
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन येथील ट्रेंट बिटमध्ये भारताच्या विरुध्द खेळण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसर्या दिवशी भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.
अँडरसनने भारताच्या पहिल्या डावाच्या दरम्यान सलामीचा फलंदाज लोकेश राहुलला बाद केले व हे यश मिळविले. राहुल अँडरसनच्या कसोटी क्रिकेटमधील 620 वा बाद होणारा खेळाडू ठरला. याच बरोबर अँडरसनने सर्वाधिक गडी बाद करणार्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले आहे.
अँडरसनने भारता विरुध्दच्या पहिल्या सामन्यातील दुसर्या दिवशी गुरुवारी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला बाद केले व कुंबळेच्या 619 कसोटी गडी बाद करण्याच्या कामगिरीची बरोबरी केली आणि तो या यादीत कुंबळे बरोबर संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर होता. परंतु शुक्रवारी त्याने लोकेश राहुल व शार्दुला ठाकूर यांना बाद केले आणि 621 गडी बाद करण्यासह कुंबळेला मागे टाकून पुढे गेला.
भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 गडी बाद केले. तर इंग्लंडच्या अँडरसनने 163 सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली.
कसोटीमध्ये सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम अजूनही श्रीलंकेचा माजी महान ऑफ फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने 133 कसोटीत 800 गडी बाद केले आहेत. यानंतर दुसर्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न असून त्याने 145 कसोटीत 708 गडी बाद केले आहेत.