विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन, नवरदेव आमदार पुत्रांवर गुन्हा दाखल
बार्शी (सोलापूर) प्रतिनिधी
29 जुलै
कोरोना काळातही नवरदेवाच्या मिरवणुकीत डीजेचा थरार आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत थाटामाटात आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा पार पडला. सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम आणि लोकप्रतिनिधींना सूट यावरून पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात होता. अखेर लग्न सोहळ्याच्या तीन दिवसानंतर दोन्ही नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा पुरस्कृत बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा लग्नसोहळा बार्शी येथील लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, कोरोना काळात लग्नाला केवळ 50 जणांच्या उपस्थितीची अट घालून देण्यात आली आहे. असे असताना या लग्नसोहळ्यात हजारो नागरिकांची उपस्थिती तर होतीच शिवाय कोणतेही नियोजन नसल्याने एकच गोंधळ पाहवयास मिळाला होता. केवळ तालुक्यातीलच नागरिक नाही तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यात आमदार खासदार यांनीही या लग्न सोहळ्यास उपस्थिती दर्शीवली होती. असे असूनही संबंधितावर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत यांच्या संस्थेत कामगार असलेल्या योगेश पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण हा सर्व दिखावपणा असून पोलीस कारवाईबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगत होती. अखेर गुरुवारी योगेश पवार याच्यासह रणवीर आणि रणजित राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला आयोजक म्हणून परवानगी काढण्यास गेलेल्या योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, सोशल मीडियात होत असलेली चर्चा आणि कोरोना काळात झालेली अफाट गर्दी यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. लग्नात माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.