नवीन रुग्णवाहिकांंमधून गरजू रुग्णांची सेवा घडो – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
सोलापूर, दि.11: जिल्ह्यासाठी राज्य शासनाने नऊ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांची सेवा घडावी, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाने जिल्ह्यासाठी नऊ नवीन अत्याधुनिक आणि वातानुकूलित रुग्णवाहिका असून यामध्ये एक मोबाईल युनिट व्हॅन उपलब्ध करून दिली आहे, त्यांचे आज नियोजन भवन येथे श्री. भरणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
नवीन रूग्णवाहिका तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनातून घेण्यात आल्या आहेत. समितीने आदर्श तांत्रिक व्यवस्था निश्चित केली असून सुधारित निकषानुसार रूग्णवाहिकेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
रूग्णवाहिका उपजिल्हा रूग्णालय पंढरपूर एक, उपजिल्हा रूग्णालय करमाळा एक, ग्रामीण रूग्णालय सांगोला एक, ग्रामीण रूग्णालय माढा एक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नरखेड (ता.मोहोळ), प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर (ता.माढा), प्राथमिक आरोग्य केंद्र, पुळूज (ता. पंढरपूर), प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसे (ता. मंगळवेढा), प्राथमिक आरोग्य केंद्र, करजगी (ता. अक्कलकोट) याठिकाणी देण्यात येणार आहेत.
सांगोला तालुक्यासाठी मोबाईल युनिट व्हॅन देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे गरोदर माता, लहान बालके यांची तपासणी करण्यात येणार आहे.
अशा असणार रूग्णवाहिका
- रूग्णवाहिका वातानुकूलित आहेत.
- रूग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहायकाला उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध.
- अत्यावस्थ रूग्णासाठी 2.2 लिटर क्षमतेचा पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर.
- सुश्रुषा साधने, प्रथमोपचार, सलाईन लावण्याची सुविधा.
- सर्व साधने उच्च प्रतीचे असणार आहेत.