सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान
सिंधुदुर्गनगरी दि.२२ – अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे – गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे – भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी – तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
खारेपाटण भुईबावडा गगनबावडा राज्य महामार्ग 171 वर झाड पडून काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या हे झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वहातूक बंद केलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचरा कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रामा 181 लोरे 2 मध्ये असलेल्या शिवगंगा पुलावरील पाण्याची पातळी वाढलेली असून पुलावरील वाहतूक बंद आहे. तिथवली खारेपाटण जामदा पुलावर पाणी आलेले असून वाहतूक बंद झाली आहे. शिरशिंगे येथे दरड कोसळली आहे. पण, कोणताही धोका नाही. आंबेरी पुलावर पाणी अल्याने येथील वाहतूकही बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
वाघोटन नदी इशारा पातळी जवळ
आज दुपारी 12 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 8.400 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.