साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत संगमनेर येथे शुभारंभ
शिर्डी, दि.11 :- कोरोनाचे संकट अद्याप संपलेला नसून कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने शासनाने जारी केलेल्या सूचना व नियमांचे पालन करतानाच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे केले.
संगमनेर नगर परिषद आणि कॉटेज हॉस्पिटल यांच्यावतीने संगमनेर शहरातील साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, आरोग्य सभापती सौ.मनिषा भळगट,दिलीपराव पुंड प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जऱ्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घोलप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्यावतीने कोरोना लसीकरणासाठी केलेल्या नियोजनाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी प्रशंसा केली. लसीकरणाद्वारे कोरोनावर मात करता येणार असल्याने सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी मंत्रीमहोदयांनी संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, आशा वर्कर, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.