नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिर्डी, दि.11 :- शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात कमी पाण्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवावे, असे अवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सन 2019-20 या हंगामात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव यादव, संभाजी वाकचौरे, दादासाहेब कुटे, सुरेश झावरे भास्करराव आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त 41 कर्मचाऱ्यांना अमृतमंथन व अमृतगाथा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भोकनळ रविंद्र दगडू (निमज ), पवार रोहिदास निवृत्ती (राजापूर), गोपाळे भास्कर पाटीलबा (सुलतानपूर), वर्पे मुरलीधर सावळेराम (कनोली ), गुंजाळ लक्ष्मण भाऊसाहेब (खांडगांव ), देशमुख त्र्यंबक व्यंकट (मंगळापूर), येवले भाऊसाहेब बाबुराव (मेहेंदुरी), शिंदे जिजाभाऊ जानकू (ओझर खु), वर्पे शिवाजी विश्राम (संगमनेर खु), बंगाळ दगडू लक्ष्मण (मेहेंदुरी), नवले सुधाकर काशिनाथ (औरंगपूर), आरोटे भास्कर पांडूरंग (मेहेंदुरी) या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह अमृतमंथन व अमृतगाथा पुस्तक, कलमी आंब्याचे रोप व रोख रक्कम प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, दूध व ऊस हे शाश्वत उत्पादन आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्याकडे व्यावसायिकतेतून पाहणे गरजेचे आहे. यामुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करताना उत्पादन खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. उत्पादन खर्च करून उत्पादकता वाढवली तर त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना होईल. कार्यक्षेत्रात जास्त उत्पादन झाल्याने बाहेरील ऊस आणताना त्या वाहतुकीचा खर्च कमी होऊन ऊसाची रिकव्हरीसुद्धा वाढेल. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कायम कारखान्याचे हदय म्हणून काम केले असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूतीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. कारखान्याने या वर्षी 13 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे. आगामी काळामध्ये कमी पाण्यावर जास्त उत्पादन यासाठी कृषी विभागाने काम करताना शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी. उसाची लागवड करून विक्रमी एकरी 125 मेट्रीक टनापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे, असे आवाहन केले.
कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. ऊस लागवड पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असून शेतकरीही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. ठिबक सिंचन पद्धत, पाच फूट सरी पद्धत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून एकरी उत्पादन वाढवणे हेच उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अण्णा राहिंज, सिताराम वर्पे, केशव दिघे, किरण कानवडे, एडवोकेट शरद गुंजाळ, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब उंबरकर, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.