घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासह शंभर बेडची नवीन अद्ययावत व्यवस्था – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात १०० बेडच्या ऑक्सिजन कोविड सेंटरचे विस्तारीकरण

शिर्डी,दि.27 :- कोरोनाच्या संकटात ग्रामीण रुग्णालयातून सुमारे तीन हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. या संकटात केलेले काम हे सामाजिक बांधिलकीचे काम असून आगामी तिसऱ्या लाटेचा मोठा संभाव्य धोका लक्षात घेऊन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यासह नवीन शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी कोविड केअर सेंटर विस्तारीकरणाचे काम होत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटरच्या पहिल्या मजल्यावर अद्ययावत  ऑक्सिजन कोविड सेंटर विस्तारीकरण कामाचा शुभारंभ मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, जि.प.सभापती सौ. मीराताई शेटे, जि.प.सदस्य सिताराम राऊत आदी उपस्थित होते.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील अद्ययावत रुग्णालय असून येथे कोरोना संकटाच्या काळात तीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. याचबरोबर या रुग्णालयात राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशीन असून पाच बायपॅप व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने शंभर बेड या हॉस्पिटलमध्ये वाढविण्यात येणार असून महिलांसाठी व पुरुषांसाठी  स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे.

याप्रसंगी मंत्री श्री. थोरात म्हणाले की, कोरोना हे जगावर आलेले मोठे संकट आहे. संगमनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाने गोरगरिबांना आधार देत अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. हे त्यांच्यासाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने ऑक्सिजन पुरवठ्यासह 100 बेड वाढविण्याकरता या कोवीड  सेंटरचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या सर्व काळामध्ये येथील डॉक्टर, नर्सेस त्यांचा सर्व स्टाफ आणि या कार्यात सहभाग घेणारे सर्वांनी खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा केली आहे. आगामी लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने अत्यंत काळजी घेणे गरजेचे असून कोणीही निष्काळजीपणा करू नका. या लाटेत सुमारे पन्नास लाख रुग्ण होण्याचा मोठा धोका असल्याची शक्यता असल्याने आपल्याला सतर्कता व काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विविध खाजगी रुग्णालयांना सुद्धा ऑक्सिजन निर्मितीसाठी सूचना करण्यात आली असून थोरात कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात सुद्धा स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आ.डॉ.तांबे, डॉ.संदीप कचोरीया, सिताराम राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर .पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.राजकुमार जऱ्हाड यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!