सावदा नगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी काळी फित लाऊन काम बंद करून जाहीर निषेध..
सावदा प्रतिनिधी
सावदा नगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फित लाऊन काम बंद करून जाहीर निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक 30 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली, तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा “संघटित निषेध” करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीसच जायबंदी करतात, यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31 रोजी सावदा नगरपरिषदेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज (अत्यावश्यक सेवा वगळून) कडकडीत रित्या बंद करण्यात आले.
यावेळी शासनातर्फे आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी मा. प्रांत. अधिकारी फैजपूर तसेच मा. किशोर चव्हाण मुख्याधिकरी सावदा यांना नगरपरिषद कर्मचारी कडून निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी करनिरीक्षक अनिल आहुजा, प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, स्वच्छता निरीक्षक महेश चौधरी, वसुली लिपिक अरुण ठोसरे किरण चौधरी, महेश माळी उपस्थित होते.