कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या उपचारासाठी साधनसामुग्री, औषधसाठा सज्ज ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली दि. 6 : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे लहान बालकांसंबधिची आवश्यक माहिती आतापासूनच तयार करण्यात यावी. लहान मुलांच्या उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी 10 निव्होनेटर व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया राबवावी. लहान मुलांना कोविड नंतर MISC चा धोका अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या संबंधिची औषधेही उपलब्ध करुन ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी. असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट 11 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. हे दिलासादायक चित्र असून हा कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट आणखी खाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्नशिल रहावे. असे आदेशित करुन पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोना रुग्ण्ा संख्या आटोक्यात येत आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिस रुग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी आल्यामुळे दिवसाला 53 मेट्रीक टन इतकी ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. ती आता कमी होऊन 34 मेट्रीक टनापर्यंत खाली आली आहे. तसेच जिल्ह्यात सुमारे 1500 रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक जरी असली तरीही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. यामध्ये येत्या काळात सुधारणा होऊन वरील टप्प्यात जाण्यासाठी जिल्हाप्रशासनाने प्रयत्नशिल रहावे. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत सुमारे 5 लाख 16 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्यस्थितीत दिवसाला 7 ते 8 हजार कोरोना चाचण्या होत आहेत. या चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात यावे. कोरोनाचा कहर काही अंशी कमी आला असला तरी जनतेने मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन आतापर्यंत जसे सहकार्य केले तसे सहकार्य या पुढील काळातही करावे. कोणत्याही प्रकारचे लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता तातडीने कोरोना टेस्ट करुन घ्यावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात सध्यस्थितीत कोरोनाबाबत सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन जिल्ह्यात सुरु असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबाजावणीबाबतची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून ग्रामीणस्तरावर सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देऊन कोरोना सध्यस्थितीत सुरु असलेल्या कामकाजाचे सादरीकरण यावेळी केले.
सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमुळे शासनाला हातभार – पालकमंत्री जयंत पाटील
सुदैवाने कोविड मर्यादेत येत आहे. आता कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट 10 ते 11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. येत्या पाच – सहा दिवसांमध्ये हा रेट 6 ते 7 टक्क्यापर्यंत येईल. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचा कोविड रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल. अशा समाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटर मुळे शासनाला चांगलाच हातभार लागत आहे. त्यामुळे शासनावरचा काहीसा भार हलका होत आहे. असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वसंतदादा डेटल कॉलेज बुधगाव येथे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यंवशी, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, संजय बजाज, जितेश कदम, सुरेश पाटील स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचे संयोजक तुकाराम मासाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या पुढाकाराने डेंटल कॉलेजच्या इमारती मध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरची व्यवस्था अतिशय चांगली झाली असून जवळपास 100 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 20 ऑक्सिजन बेड, 20 लहान मुलांसाठी बेड, 50 रेग्युलर बेड व 5 व्हेटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ज्या पदध्दतीने व्यवस्था असतात अशा पध्दतीच्या खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यामुळे एक चांगली व्यवस्था सांगलीकरांना व खास करुन मिरज तालुक्यातील ग्रामीण भागाला उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सुरु करण्यात आलेल्या एका चांगल्या जनसेवेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या दिड दोन वर्षापासून जगात, भारत व महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये प्रचंड मोठी हानी झाली, व्यवसाय ठप्प झाले. या पार्श्वभूमी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य अधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस हे सर्व दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लक्षणे व त्याचे होणारे परिणाम वेगळे असल्यामुळे त्यासाठी संघर्ष करावा लागला. आता कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत राज्याच्या व सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, ग्रामीण भागात, शहरी भागात कोविड सेंटर उभा करुन अनेक लोक, सेवाभावी संस्था, खासगी संस्था त्या परिसरातील रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहेत.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील व इतर मान्यवरांनी स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली.