पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सांगली प्रतिनिधी

दि. 02 :  महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्ररस्तांशी संवाद साधताना दिली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज कसबे डिग्रज व मौजे  डिग्रज या पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी  कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने,आमदार मोहनराव कदम. आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार अरूण लाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

पुराचे संकट प्रत्येक वर्षी येते.  पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता यावर कायम स्वरूपी उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाची तयारी आहे. पूरबाधित गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनाचा पर्याय निवडल्यास त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे, आश्वासन मुख्यमंत्री श्री.  ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना दिले.

मौजे डिग्रज व कसबे डिग्रज येथील पाहणी दौऱ्यात नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदने सादर केली. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत दिली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!