एलपीजी टँकर उलटून १७ तासांनंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत….

रत्नागिरी – २३ सप्टेंबर –

लांज्याजवळ अंजनारी पुलावरून गुरुवारी दुपारी एलपीजी टँकर उलटला होता. या अपघातात टँकर चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तास उलटूनही अद्याप प्रभावित आहे. टँकरमधील एलपीजी वायू सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टँकरमध्ये गॅस असल्याने आसपासच्या रहिवासी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कंपनीचा हा टँकर गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी पुलावरून काजळी नदीपात्रात उलटला. जयगडहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर उलटला. या अपघातात उस्मानाबादचे चालक प्रमोद जाधव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या टँकरमध्ये जवळपास २४ ते २५ किलो एलपीजी वायू असल्याची माहिती आहे. या टँकरमधून वायू गळती होत असल्याने आजूबाजूच्या परिसरात धोका वाढला होता. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या टँकरमधील वायू गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पथकासह ‘फिनोलेक्स’, ‘जिंदाल’ कंपन्यांची सुरक्षा पथके दाखल झाली आहेत. उंचावरून नदीपात्रात कोसळल्यामुळे टँकरचे तीन तुकडे झाले आहेत.

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पुणस, काजगघाटी, रत्नागिरी अशी वळवण्यात आली आहे. तसेच, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!