’हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’, नारायण राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर ’प्रहार’!

रत्नागिरी,

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या ’प्रहार’ वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आजच्या प्रहारमध्ये देखील ’हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असं सदर छापून आलं आहे. प्रहार पेपरच्या पहिल्या पानावर हा मथळा छापला गेलाय. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात ’हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष्य करणार आहेत.

’प्रहार’च्या आजच्या अंकात याबाबत सांगितलं असून यात म्हटलं आहे की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणार्‍या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीनं पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणार्‍या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाणी प्रहार, ’हार आणि प्रहार’, उद्याच्या अंकात वाचा, असं प्रहारमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना म्हटलं होतं की, हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे. मी पूर्वी बोललो होतो की माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. घराबाहेर पडल्यावर देश हा माझा धर्म. जर या धर्माआड कोणी आल तर कडवट देशाभिमानी म्हणून आम्ही उभे राहू. लोकशाहीत सर्वात मोठ शस्त्र म्हणजे मत. त्याच्या आधारे तुम्ही रंकाचा राव आणि रावाचा रंक करु शकता. सामान्य जनता सर्वात शक्तीमान आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली होती. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले होते.

नारायण राणेंनी काय म्हटलं…

चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात नारायण राणे यांनी म्हटलं होतं की, माझा जन्म सिंधुदुर्गातील आहे. मात्र मी मुंबईत आलो. मला बाळासाहेबांनी पुन्हा इकडं पाठवलं. मी आलो आणि निवडूनही आलो. इथं खूप समस्या होत्या मात्र मी बाळासाहेबांच्या प्रेरणेनं इथं विकासकामं केली. साहेबांच्या आशिर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. मी कोकणात विकासाची अनेक कामं केली पण मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही, ते श्रेय बाळासाहेबांचं आहे की ज्यांनी मला संधी दिली, मी निमित्तमात्र होतो, असंही ते म्हणाले होते. नारायण राणे म्हणाले की, गोवा हायवेच्या कामात कंत्राटदारांना कोण अडवतं? असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणेंनी केला होता. राणे म्हणाले की, आमचं भागवा आणि काम सुरु करा अशी भूमिका कुणी घेतली ते आज मंचावर उपस्थित आहेत, असंही राणे म्हणाले होते. राणे म्हणाले की, विमानतळ झालंय मात्र बाहेरचे रस्ते खराब आहेत. इथले लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणीतरी नेमा, असंही ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले. आदित्य ठाकरे हे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. तर विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा असंही राणे म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!