भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, दि. २५ :
संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते परंतू त्यापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे केवळ भाषांतर किंवा पाठांतरापूरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, रामटेकच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, कुलगुरु प्रो.श्रीनिवास वरखेडी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ.दिनकर मराठे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, आपले वेद वाङ्मय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता आले तरी किमान या भाषेचे ज्ञान आपल्याला असायला हवे. त्यांनी संस्कृत ही अनेक भाषांची जननी असल्याचे सांगत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व मिळून पुढाकार घेऊया असे आवाहनही केले.
मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथे संतपीठाची सुरुवात व आज संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची रत्नागिरी येथे होत असलेली सुरुवात हे दोन सुवर्ण क्षण असल्याचे सांगून म्हणाले की, रत्नागिरी मध्ये लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु होत आहे, आज संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले आहे भविष्यात पीपीई मॉडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावास मंजूरी द्यावी.
कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी देशात १८ संस्कृत विद्यापीठे असून त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक येथे असल्याची माहिती दिली. ज्ञानदान, विकास आणि रोजगार संधींची उपलब्धता करून देणारे हे संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र समाजउपयोगी संसाधनांच्या निर्मितीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्कृत विद्यापीठाची पुणे, परभणी, जळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजित असून त्यास शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती वित्त व लेखा अधिकारी रामचंद्र जोशी आदी उपस्थित होते.