पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे कुरुळ येथील इमारती तसेच जागेसंबंधीचा भाडेतत्त्व करार परस्परांना सुपूर्द

अलिबाग, जि.रायगड, दि.12 :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा, टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा प्रति विद्यार्थी रु.2 हजार प्रति सेमिस्टर (शासकीय वसतीगृह शुल्क) इतक्या भाडयाने 3 वर्षाकरिता घेण्यास व त्यानुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व आणि संशोधन यांनी सादर केलेल्या सामंजस्य कराराच्या मसुद्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या भाडेतत्त्वकराराची प्रत आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर व आर.सी.एफ. थळचे मुख्य व्यवस्थापक श्री.एस.डी.देशमुख आणि मनुष्यबळ तथा प्रशासन व्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी यांनी परस्परांना सुपूर्द केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे खासगी सचिव डॉ.जगन्नाथ वीरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अलिबाग कार्यकारी अभियंता राहूल मोरे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ यांची उपस्थिती होती.

या भाडेकरारानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी ज्या महिन्यात प्रथम निरीक्षण होईल त्या महिन्यापासून भाडेपट्टी करार अंमलात येईल. या भाडेकराराची मुदत 3 वर्ष राहील. या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची (NMC) मान्यता मिळाल्यानंतरच या जागेबाबतचे भाडे अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच होणार कार्यान्वित

जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने प्रत्येक रायगडकरास उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी मी कटिबध्द आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व आवारातील सोयी-सुविधा, अलिबाग शासकीय महाविद्यालय अशा विविध बाबींचा मी सतत पाठपुरावा करीत असून येणाऱ्या काळात प्रत्येक रायगडकरास उत्तम आरोग्य सुविधा मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय व आवारातील सोयीसुविधांची पाहणी करण्याकरिता तसेच अलिबाग शासकीय महाविद्यालय कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेण्यासाठी त्या अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे आल्या होत्या, त्याविषयी एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीच्या वेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.गिरीष ठाकूर, पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे खासगी सचिव डॉ.जगन्नाथ वीरकर, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ, मानसोपचार तज्ञ तथा समुपदेशक डॉ.अमोल भुसारे, आरटीपीसीआर लॅब समन्वयक डॉ.शितल जोशी, कनिष्ठ अभियंता श्री.राहुल बागूल, कनिष्ठ अभियंता कु.धनश्री भोसले आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत रस्ते, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, जिल्हा परिषदेचे आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पार्किंग, गॅरेज, वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची जागा (गारबेज युनिट), मीटर रुम, ऑक्सिजन प्लँट, लेक्चर हॉल, वाचनालय, नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अशा विविध कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबींसंबंधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शक्य तितक्या लवकर ही कामे पूर्ण करण्याविषयीचे निर्देश दिले.

त्याचबरोबर अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथील प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार असल्याने त्यादृष्टीने आवश्यक असणारी संबंधीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या सतत पाठपुरावा करीत आहेत.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार 798 रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 4 टप्प्यात एकूण 510 पदे निर्माण करण्यासही शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय तातडीने कार्यान्वित होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ 44 अध्यापकांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याविषयीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ,अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा, टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा प्रति विद्यार्थी रु.2 हजार प्रति सेमिस्टर (शासकीय वसतीगृह शुल्क) इतक्या भाडयाने 3 वर्षाकरिताचा सामंजस्य करारही झाला आहे.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 100 जणांची पहिली तुकडी साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरु होईल. हे लक्षात घेवून अत्यंत काटेकोरपणे कालबध्द नियोजन करुन अभ्यासवर्ग, प्रयोगशाळा, वाचनालय, वसतिगृह, प्रशासकीय इमारत आदि कामे पूर्ण होण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सांगितले. इंडियन मेडिकल कौन्सिलच्या निकषाप्रमाणे अटी व शर्तींची पूर्तता काटेकोरपणे करणे, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. यासाठी पुढील दोन महिने संबंधीत प्रत्येक अधिकाऱ्याने नेमून दिलेल्या कामाच्या जबाबदाऱ्या झपाटून पूर्ण कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

सर्वांनी एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून प्रत्येक रायगडकरास उत्तम आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शेवटी व्यक्त केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!