रत्नागिरीला झोडपणार पाऊस; पुढील 4 दिवस पुण्यात दमदार हजेरी
पुणे प्रतिनिधी
20 जुलै
मागील आठ दिवसांपासून पुण्यासह कोकण परिसरात पावसानं धूमशान घातलं आहे. आज कोकणात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला, तरी बहुतांशी ठिकाणी ऑॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रत्नागिरीला पुन्हा पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील अन्य सात जिल्ह्यांना ऑॅरेंज अलर्ट दिला आहे. आज राज्यात मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑॅरेज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत आज पावसानं काहीसी उसंत दिली आहे. पण सायंकाळनंतर मुंबईत काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्यानं आज मुंबईला येलो अलर्ट दिला आहे.
पुढील चार दिवस पुण्यात मुसळधार पाऊस
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस पुणे जिल्ह्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या आणि परवा म्हणजेच 21 आणि 22 जुलै या दोन दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर 23 तारखेला ऑॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळाधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या गडगडाटासह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण विदर्भात अजूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवस विदर्भात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज आणि उद्या विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात पावसाची पुर्णपणे उघडीप झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता खूप कमी आहे.