’साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप’, अजित पवारांनी वाचून दाखवली विकलेल्या कारखान्यांची यादी
पुणे,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणार्या टीकेवर आज उत्तर दिलं. त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ-ष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण 30 कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी सांगितलं की, राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने विकले. सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वत: विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेत, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसर्याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असं अजित पवार म्हणाले.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला.जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले की, नियम सर्वांना सारखेच आहेत. आज सगळी कागदपत्रं घेऊन आलो आहे, असं ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल तर त्यावर कारवाई करा, असंही ते म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणार्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता.
पुण्यातील ग-ामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होउ नये यासाठी पाडला. अनेक तंत्रांचा वापर करण्यात आलाय. हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे काम सुरु करण्यात येईल, असंही ते म्हणाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असंही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पिक विमा कंपन्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सज्जड दम दिला आहे. अजित पवारांनी म्हटलं आहे की, राज्यात शेतकर्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकर्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
..तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी, अजित पवारांचं सुतोवाच
अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकर्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार यांनी सांगितलं. आम्ही वेडंवाकडं करा, असं काही सांगत नाही पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.