पांगळोली गावाची पाणी योजना पोलादपूर तालुक्याला आदर्शवत्- चंद्रकांत कळंबे यांचा विश्वास
पोलादपूर,
तालुक्यातील अनेक गावांतून होणार्या विकासकामांबद्दलच्या मागण्यांचा विचार करता आमदार आणि खासदारांकडे सातत्याने होणार्या मागण्यांमध्ये ज्या मागण्यांचा समावेश असतो. त्या तुलनेमध्ये पांगळोली गावाकडून होणार्या मागण्यांमध्ये गावाच्या विकासाचाच विचार असतो. पांगळोली गावाने आरसीसी विहिर बांधून गावाच्या फंडातून अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकून पोलादपूर तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला.
पांगळोली नवीन विहिर पाईपलाईल नळपाणी योजनेचा ग्रामार्पण आणि बोअरवेल तसेच बौध्दवाडी रस्त्याचे उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ग-ामविकास मंडळ पांगळोली शाखा पुणेचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामरचनाकार के.पी.जगताप होते. याप्रसंगी पोलादपूर संपर्कप्रमुख किशोर जाधव, रायगड जि.प.सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कोंढवी गण विभाग प्रमुख सतीश शिंदे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे तसेच सरपंच सविता शेलार, अध्यक्ष भगवान शेलार, रामचंद्र जगताप, नंदू जगताप, काशीराम जगताप, पुणे शाखेचे पुनाजी जगताप, संदीप मोरे, राजेंद्र जगताप, शरद निगुडसे, ज्ञानेश्वर खरोसे आणि तानाजी कदम तसेच मुंबई शाखेचे भरत जाधव, सुभाष जगताप, राजू म्हस्के, सतीश शेलार, विलास महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.भरत गोगावले यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहायचे असल्याने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झाल्याने या पूर्वनियोजित कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, आ.गोगावले यांनी, पांगळोली गावच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागणी मान्य करा, असा आदेश दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, ग्रामस्थांकडून आमदार, खासदारांकडे सभामंडप, मंदिर यासाठी निधी मागण्याची चुकीची परंपरा असून ग्रामस्थांकडून जर धरण, कॉलेज, मोठे प्रोजेक्ट याची मागणी कधीही केली जात नाही, अशी खंत व्यक्त करीत ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी विचार बदलून मोठ्या मागण्या केल्या गेल्यास गावा-गावांचा सर्वांगिण विकास शक्य होईल, असे मत मांडले. यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी, संस्थापक अध्यक्ष के. पी. जगताप व रामभाऊ जगताप यांनी त्यांच्या भाषणामध्ये पांगळोली गावात ज्या सुधारणा करायच्या आहेत तेच विषय मांडले असल्याबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने आरसीसी विहीर बांधल्यानंतर आता पाणी खूप आहे. पण गावापासुन पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर ही विहिर असल्याने वयोवृद्ध लोक पाणी आणू शकत नसल्याने पुणे मंडळाने गांवफंडातून चार लाख रुपये खर्च करीत अंडरग-ाउंड पाईप लाईन टाकून गावातील टाकीत पाणी आणून सोडल्याचे यावेळी कौतुकही केले.