विसाव्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात कन्यापूजन कार्यक्रम संपन्न
मुंबई,
विसाव्या पुणे नवरात्र महिला महोत्सवात दरवर्षी प्रमाणे यंदाही ’कन्यापूजन’ कार्यक्रम ललितापंचमीच्या मुहूर्तावर रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण वसंतराव बागुल उद्यानाजवळ, शिवदर्शन पुणे येथे संपन्न झाला. सुमारे 150 लहान मुली यात सहभागी झाल्या होत्या, त्यांचे पाय धुऊन त्यावर आणि कपाळावर स्वस्तिक काढले गेले. त्यांना कुंकुम तिलकासह ओवाळले जाऊन त्यांची पूजा व आरती केली गेली. त्यांच्यावर फुलांचा वर्षावही केला गेला. याप्रसंगी भजने तसेच देवीची गाणी सामुहिक रित्या म्हटली गेली. यानंतर सर्व सहभागी मुलींना खाऊ व आकर्षक भेटवस्तू दिल्या गेल्या. समाजातील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला व्हावा, स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी व त्यांच्यातील गुणांना संधी मिळावी आणि त्याची सुरुवात लहान वयापासूनच व्हावी यासाठी दरवर्षी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ’कन्यापूजन’ कार्यक्रम केला जातो असे पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा व आयोजक जयश्री बागुल यांनी सांगितले. यावेळी मुलींचे पालकही उपस्थित होते. करोना परिस्थितीतील नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या निर्मला जगताप, दीपा बागुल, छाया कातुरे आणि योगिता निकम यावेळी उपस्थित होत्या. पुणे नवरात्र महोत्सवाचे संस्थापक आयोजक आबा बागुल यांनी या सर्व मुलींना शुभेच्छा दिल्या.