रजनी इंदुलकर यांच्या घरावर सलग तिसर्या दिवशीही छापेमारी सुरू
पुणे
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. सातार्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर देखील चौकशी करण्यात आली आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिण नीता पाटील, डॉ.रजनी इंदुलकर तसेच कोल्हापूर येथील विजया पाटील या तिन्ही बहिणींच्या घरी तसेच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. सलग तिसर्या दिवशीही हि छापेमारी सुरु आहे.
पवार कुटुंबीयांशी संबंधित ज्या ठिकाणांवर 7 ऑक्टोबर रोजी इनकम टॅक्स विभागाने छापे टाकले तिथे आजही छापेमारी सुरु आहे. इनकम टॅक्स विभागाचे अधिकारी आणि त्यांना सुरक्षा पुरवणारे केंद्रीय सुरक्षा पथकांचे जवान छाप्याच्या ठिकाणीच दोन दिवसांपासून मुक्कामाला आहेत. अजित पवारांची पुण्यातील बहिण डॉक्टर रजनी इंदुलकर यांच्या घरी तिसर्या दिवशीही इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन बहिणी आहेत. रजनी इंदुलकर हे पुण्यातील बावधन भागात राहतात.तर निता पाटील हे देखील पुण्यातील शिवाजीनगरला राहतात. आणि विजया पाटील या कोल्हापुरात असतात. विजया पाटील यांच्या घरी देखील आयकराचे छापे सुरु आहोत. आयकर विभागाकडून पुणे शहरातही एका सोसायटीतील सदनिकेवर छापा घालण्यात आला. साखर कारखाना व्यवहारातील कारणावरून हा छापा मारण्यात आल्याचे समजते. कर्वे नगरमधील या सोसायटीत सकाळीच आयकर विभागाचे पथक साध्या देशात पोहचले. त्यांच्याबरोबर पोलिसांचीही एक गाडी होती.
विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर छापे
अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकार्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.
सगळं सांगणार…पाहुणे अजूनही घरी आहे
आयकर विभागाला कुठल्याही कंपनीवर छापा मारण्याचा अधिकार असतो. तो अधिकार त्यांना कायद्याने दिलेला आहे. त्यांच्या चौकशीत मला व्यत्यय आणायचा नाही. त्यांचे काम झाल्यावर मी राज्यात किती कारखाने विकले. कोणाच्या काळात विकले गेले. आणि त्याच्या किमती काय आहे. किती कारखाने चालवायला दिले. कोणाच्या काळात दिले गेले त्याची काय अवस्था आहे. जे कारखाने विकले गेले ते कुणामुळे विकले गेले याबाबत सविस्तर माहिती देईन असेही काल अजित पवार यांनी सांगितलं.