धक्कादायक : लघुशंकेला जाणे पडले महागात; मुकावे लागले 97 लाखांना

पुणे,

शहरातील हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील व्यावसायिकाला लघवीला जाऊन येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन कार चालक फरार झाला आहे.

ही घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विजय हुलगुंडे असे फरार आरोपी चालकाचे नाव असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूटस व्यावसायिकाने हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण सोमवारी 97 लाख रुपयांची रक्कम बघून चालकानं व्यावसायिकाला गंडा घातला आहे. नेमकं काय घडलं? फिर्यादी व्यावसायिक सोमवारी व्यावसायिक रक्कम घेऊन कोंढव्यातून हडपसरकडे येत होते. दरम्यान त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी कल्याणीनगर परिसरात चालकाला गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगत फिर्यादी लघवी करण्यासाठी गाडीतून बाहेर आला. दरम्यान पैशांनी भरलेली बॅग गाडीतच ठेवली होती. याची संधी साधत आरोपी चालकाने काही अंतर गाडी पुढे नेऊन उभी केली. त्यानंतर काही वेळातचं पैशाची बॅग घेऊन पळ काढला आहे. फिर्यादी लघवी करून परत येईपर्यंत चालक आणि पैसे दोन्ही गायब होते. याप्रकरणी फिर्यादीने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!