पुणे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
पुणे,
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील सेसची वसुली बाजार समितीमार्फत थेट खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर होण्यासाठी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय देशमुख, सचिव संदीप देशमुख, पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. गरड आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शेतकरी व ग्राहकांचे हीत लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे. समितीच्या कामकाजात गैरव्यवहार आणि कामगारांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका फिरतांना कुठल्याही प्रकारची अडचण होता कामा नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तसेच आडतिया असोसिएशन आणि पुना मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000
उत्तम काम करून गावाचा विकास करा- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
पुणे, दि.७:- माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि उत्तम प्रकारचे काम करून गावाचा विकास करा. परिश्रमपूर्वक गावाचा विकास करणाऱ्याच्या पाठीशी शासन असल्याचे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात ‘यशदा’च्यावतीने आयोजित लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंचसाठी सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गास भेटीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, संस्थेचे संचालक डॉ. भास्कर पाटील, यशदाचे उपसंचालक भिमराव वराळे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, गावात विकासात्मक कामे करतांना सर्वांना सोबत घेत बारकाईने लक्ष देवून कामे करुन घ्यावीत. कामातून लातूर जिल्ह्यची ओळख राज्याचा नकाशावर येण्यासाठी सतत प्रयत्न करावे. गावातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती द्यावी. या प्रशिक्षणाचा उपयोग करुन गावातील समस्या सोडवाव्यात. सतत नवनवीन प्रयोग करुन गावाची प्रगती करावी, असेही ते म्हणाले.
प्रशिक्षण वर्गाच्यावतीने वाढोना खुर्दचे सरपंच विलास मुसणे यांनी सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांचा सत्कार केला.
‘यशदा’च्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग गावाच्या विकासासाठी नक्की करु, अशा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला.
0000
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
पुणे, दि. 7:- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदिप देशमुख, संचालक संजय पानसरे, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. गरड, सहसंचालक विनायक कोकरे, संस्थेचे संचालक डॉ. भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेतर्फे उभारण्यात येत असलेल्या फुले गुणवत्ता केंद्रास भेट देवून ग्लोबल व लोकल, कार्नेशन लागवड, पॅकहाऊस इत्यादीबाबत माहिती जाणून घेतली.
बांबू सामान्य सुविधा केंद्राचे उद्घाटन
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर संचलित राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या बांबू सामान्य सुविधा केंद्राचे (बांबू मुल्यवर्धन केंद्र) उद्घाटन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हस्ते करण्यात आले. त्यांनी केंद्रातील सुविधांची माहिती घेवून याबाबतचे प्रशिक्षण लवकर सुरू करण्याच्या सुचना दिल्या.