क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, कोल्हापूर तसेच महिला-बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने पोषण मासनिमित्त वेबीनारचे आयोजन….
‘निरोगी आरोग्याकरीता योग आणि पोषण’ विषयावर वेबीनारमध्ये मार्गदर्शन
पुणे/कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2021
प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, कोल्हापूर तसेच महिला-बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने आज पोषण मासनिमित्त वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.
‘निरोगी आरोग्याकरीता योग आणि पोषण’ विषयावर या वेबीनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर; डॉ. शुभांगी पार्टे, जिल्हा परिषद आयुष समिती सदस्य; संजय देशपांडे, जीवन ज्योती स्वयंसेवी संघटना, कोल्हापूर यांनी या वेबीनारमध्ये मार्गदर्शन केले.
पोषण अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निरोगी आरोग्य आणि पोषक आहाराचे महत्व याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून त्यासाठी पोषण महिन्यामध्ये आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत शिल्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार गरजेचा असून त्यामध्ये ऋतुमानानुसार बदल करणे आवश्यक आहे. अति शीत तसेच अति उष्ण आहार टाळावा, चावून खाण्यासारखे पदार्थ आहारात असावेत, भूक लागल्यानंतर आहार घेणे गरजेचे, आहाराबरोबर कोमट पाणी घेतल्यास पोषण व्यवस्थित होण्यास मदत होते इत्यादी आहाराच्या सवयी बद्दल डॉ. शुभांगी पार्टे यांनी माहिती दिली.
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ वीस कोटी लोक कुपोषित आहेत, यात बालके, प्रौढ, वृद्ध अशा सर्वांचाच अंतर्भाव आहे, याची जाणीव संजय देशपांडे यांनी करून दिली. कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे असून त्यादृष्टीने सरकारच्या वतीने अनेक प्रयत्न सुरु आहेत, या प्रयत्नांना समाजाने देखील आपली जबाबदारी समजून काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन देशपांडे यांनी यावेळी केले.
क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे आभार मानले.