आमदार झाल्यानंतरही तोच स्वभाव, वाहतूक पोलिसाकडून रोहित पवारांचं कौतुक
पुणे,
वाहतूक नियमांचं जराही उल्लंघन केलं तर वाहतूक पोलीस लगेच दंडाची पावती आकारतात. तेव्हा आपल्याला अनेकदा रागही येतो. रस्त्यावर काही नागरिक पोलिसांशी हुज्जतही घालतात. पण हेच पोलीस जेव्हा एखाद्या व्हीआयपी नागरिकाला दंडाची पावती फाडतात. तेव्हा संबंधित पोलिसांने बजावलेल्या कर्तव्याचं कौतुक केलं जातं. रोहित पवारांनाही आमदार नसताना एका वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती फाडली होती. रोहित पवार आमदार झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्या घटनेची आठवण करून देत रोहित पवारांच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी संबंधित प्रसंगाची माहिती स्वत: आपल्या फेसबुक अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचार्यांची काल पुण्यात एके ठिकाणी भेट झाली. यावेळी त्यातील काही पोलिसांनी रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रोहित पवारांनीही त्यांच्यासोबत फोटो काढला.
विशेष म्हणजे यातील एका कर्मचार्याने मे 2019 मध्ये रोहित पवारांच्या गाडीवर दंड आकारला होता. ही घटना रोहित पवार विसरून गेले होते, पण संबंधित कर्मचार्याने त्या घटनेची आठवण करून दिली. तसेच रोहित पवारांचा आमदार नसतानाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव यात काहीच फरक नसल्याचंही सांगत वाहतूक पोलिसाने यावेळी दंडाची नाही, तर चांगल्या वर्तणुकीची पावती दिली आहे. वाहतूक पोलिसाने स्वभावाचं केलंल कौतुक ऐकून सुखद धक्का बसल्याचं रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यावेळी रोहित पवार यांनी नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन देखील केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ऊन, थंडी, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता वाहतूक पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी 12-12 तास रस्त्यावर उभं राहून आपलं कर्तव्य बजावतात. याबद्दल मला त्यांचा नेहमीच आदर वाटत आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत न घालता त्यांना नेहमी सहकार्य करावं, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.